Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : राज्य शासनाचा राज्यातील भाडेकरूंना दिलासा , किमान तीन महिने भाडे न मागण्याच्या सूचना

Spread the love

राज्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार  यांनी शासनाच्या वतीने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी भाडेकरुंकडून तीन महिने भाडे वसूल करू नये आणि भाडे न दिल्यामुळे भाडेकरुंना घराबाहेर काढू नये, अशा सूचना  केल्या आहेत.  राज्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने अनेकांच्या आर्थिक अडचणी सुरू झाल्या असून कारखाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक अस्थापने बंद झाल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.

दरम्यान करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला असून येत्या ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा, सरकारी आणि खासगी अस्थापने, कारखाने आणि सर्वच आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या रोजगारावरही झाला आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. राज्यात भाड्यांच्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक आहे. करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीत त्यांना घराचे भाडे भरणे शक्य नसून त्यामुळे त्यांचे भाडे थकत असल्याचं दिसून आलं आहे.

राज्य सरकारने या पार्श्वभूमीर  आज एक परिपत्रक काढून भाडेकरुंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीत सर्व घरमालकांनी भाडेकरुंचे भाडे तीन महिन्यांसाठी पुढे ढकलावे. त्यांच्याकडून तीन महिने भाडे वसुली करू नये. तसेच या तीन महिन्यांच्या कालावधीत भाडे भरता न येणाऱ्या कोणत्याही भाडेकरुंना घरातून बाहेर काढू नये, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीनिशी हे परिपत्रक काढण्यात आलं असून त्यामुळे भाडेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!