#CoronaAurangabadUpdate : औरंगाबादेत कोरोनामुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू , एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोरोना…

कोरोनाबाधित ६८ वर्षीय रूग्णाचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे उपचारा दरम्यान आज दुपारी १.१४ वाजता मृत्यू झाला. हा रूग्ण औरंगाबाद शहरातील आरेफ कॉलनीतील रहिवासी आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय (मिनी घाटी)तून ८ एप्रिल रोजी या रुग्णास पुढील उपचारासाठी घाटीत हलविले होते.
ताप, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास ३ एप्रिलपासून या रूग्णास होत होता. त्यावर घाटीत उपचार सुरू होते. परंतु प्रकृती खालावल्याने ८ एप्रिल रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. ९ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने ११ एप्रिल रोजी त्यांची परत दुस-यांदा कोरोना तपासणी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती खालावल्याने ११ एप्रिलपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रूग्णास किडनी व श्वसन संस्थेशी निगडीत आजारही होते, अशी माहिती घाटी प्रशासनाच्यावतीने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात २४ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते त्यापैकी एकाच कुटुंबातील ८ रुग्ण आहेत तर इतर रुग्णही एकमेकांच्या घरातीलच आहेत. २४ पैकी आता दोन मृत्यू एक जण बारा झाला असून उर्वरित २१ रुग्णांवर उपचार चालू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या संसर्गानं मृत्यू झालेल्या या ६८ वर्षीय व्यक्तीच्या मुलाला सर्वात आधी करोनाची लागण झाली होती. तो आयटी इंजिनीअर असून, पुण्याहून औरंगाबाद शहरात आला होता. त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे वडील आणि ७९ वर्षीय काकांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच याच आयटी इंजिनीअरच्या संपर्कातील एकूण आठ व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे आणि सर्व बाधित रुग्ण आहे हे आसपासच्या परिसरात राहणारे आहेत, अशी माहिती मिळते. दरम्यान मृत्यू झालेल्या ६८ वर्षीय रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होती व त्याच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता व त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान याच रुग्णाचा अहवाल आधी निगेटिव्ह, तर काही दिवसांनी पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य करोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.