#CoronaVirusUpdate : औरंगाबादेत वाहतूक पोलिसाला मारहाण, महिला पोलीस मध्ये पडल्या तर पुरुष पोलीस झाले बाजूला , एकाने घेतले शूटिंग….

औरंगाबाद शहरात लॉक डाऊनच्या काळात काही भागातील तरुणांची वर्दळ चालूच आहे. विशेषतः शहागंज , बुढी लेन, रोशनगेट , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागातील अनेक फिरस्ते तरुण बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत , दादागिरी करीत रस्त्यावर फिरत आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चांदणे चौकाजवळ वाहतूक पोलिसांनी अशाच काही तरुणांना अडवले त्याचा राग आल्याने त्यांनी एका वाहतूक पोलिसाला त्याच्याच हातातील काठी घेऊन बेदम मारहाण केली.
विशेष म्हणजे यावेळी वाहतूक पोलिसांबरोबर इतर पोलिसही हजार होते त्यापैकी एक शूटिंग घेण्यात व्यस्त होता , दुसरा मागे उभे होता एक मार खाणाऱ्या पोलिसांसोबत होता परंतु जेंव्हा त्या वाहतूक पोलिसांच्या हातातील काठी घेऊन त्या तरुणाने वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तेंव्हा त्याच्या सोबतच पोलीस पुढे निघून गेला , तो पुन्हा जवळही आला नाही . यावेळी उपस्थित दोन महिला आणि एक पोलीस मात्र त्या पोलिसांच्या मदतीला धावून गेले आणि सोडावा -सोडावी करू लागले. वास्तविक पोलिसाला मारहाण करणारे दोन जण होते तर पोलिसांची संख्या ५-६ होती तरीही त्यांनी मध्यस्थी करण्यावाचून आणि शूटिंग करण्यावाचून काहीही केले नाही नाही . या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तरुणांवर तर कारवाई करावीच परंतु एका पोलिसाला समाजकंटकाकडून मारहाण होत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे योग्य ठरेल.
मुंबईत कोरोनाचा कहर चालूच…
मुंबईच्या वरळीतील करोनाचा कहर थांबताना दिसत नाही. काल संपूर्ण मुंबईत १०६ करोना रुग्ण सापडलेले असतानाच आज एकट्या वरळीत ५५ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ६९६ वर गेली आहे. तर केईएममध्येही एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. जी/ दक्षिण विभागात रुग्णांची संख्या १३३वर पोहोचली आहे. सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोना विषाणू तिसऱ्या टप्प्यात पोहोचत असल्याचं बोललं जात आहे. वरळीत झोपडपट्ट्या अधिक असल्याने करोनाचे थैमान रोखण्याची आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. पोलिस आणि पालिकेने या परिसरातील अनेक भाग सील केले आहेत. या ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. औषधांची फवारणीही होत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
केईएममध्ये डॉक्टरलाही कोरोनाची बाधा….
केईएममध्ये काल एका स्वच्छता कर्मचाऱ्याला करोनाची लागण झालेली असतानाच आज केईएमच्या एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर वरळीचा रहिवासी असून तो कुणाच्या संपर्कात आला होता, याचा तपास सुरू आहे. काल मुंबईत करोनामुळे पाच जण दगावले. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ४५वर पोहोचली आहे. काल केईएम रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर कस्तुरबामध्ये एका ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांना ताप येत होता आणि श्वास घेण्याचा त्रास होत होता. यातील तिघांना मधुमेहाचा आणि एकाला दम्याचा त्रास होता. दरम्यान, मुंबई पालिकेने २४ वॉर्डांमध्ये क्वॉरंटाइनची व्यवस्था केली आहे. या सेंटरमध्ये सुमारे ११ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय आणि लो रिस्क रुग्णांना या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यात काल दिवसभरात ११७ नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११३५वर गेली आहे. यात पुण्यात २ आणि कल्याण-डोंबिवलीतील एका मृताचा समावेश आहे.
विदर्भातही वाढू लागले कोरोनाचे रुग्ण
विदर्भात नागपूरनंतर करोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरलेल्या बुलडाण्याचे टेन्शन आणखी वाढले आहे. बुलडाण्यात आज आणखी तीन नवे हायरिस्क रुग्ण सापडले असून येथील करोना रुग्णांची संख्या १५वर पोहोचली आहे. बुलडाण्यात आज सापडलेल्या तीन रुग्णांपैकी शेगाव येथील दोन तर खामगाव तालुक्यातील चितोडा गावच्या एकाचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण हायरिस्क झोनमधील असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. तसेच आज सापडलेल्या तिन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांचे ही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय हे तिन्ही रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेले १३ राज्यांतील ६० जिल्हे १४ मेनंतरही कमीत कमी दोन आठवड्यांकरता पूर्णत: लॉकडाऊन ठेवावेत, अशीही शिफारस सरकारकडे करण्यात आलीय. १४ मे नंतरही तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मोकळेपणानं फिरू शकाल, अशी शक्यताही सध्या दिसत नाही. राज्यांच्या सीमा मोकळ्या करण्याचा प्रश्नच येत नाही, असं एका सरकारी अधिकाऱ्यानं म्हटलंय. याशिवाय रेल्वे, मेट्रो आणि विमान प्रवासही लवकर सुरू होण्याची चिन्हं नाहीत. मात्र, मेडिकल, किराणा स्टोअर्स यांच्यासोबत काही गरजेच्या गोष्टींची दुकानं सुरू करण्यासाठी सूट मिळू शकते. परंतु, त्यातही करोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणं आणि शहरांसाठी वेगळे नियम असतील