#CoronaVirusEffect : मरकज : दिल्लीवारी केलेल्या समुदायाची चौकशी आणि तपासणीसाठी धरपकड , कलाग्राममध्ये केले क्वारंटाईन !!

औरंगाबाद -दिल्ली येथे तबलिग जमातच्या मरकजसाठी जाऊन आल्याच्या संशयावरून त्यांच्या तपासणीसाठी आणि चौकशीसाठी शहर पोलीस आणि आरोग्य खात्याच्या पथकाने शहरातील मुल्ला मौलवीची धरपकड सुरू केली आहे. एकुण तीन जमात आणि अन्य ८ मुस्लीम असे ३२ जण कलाग्राममध्ये दाखल करण्यात आले आहेत. या धरपकडीमुळे मुस्लीम मोहल्ल्यामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिल्लीतील मरकजला जाऊन आलेली एक जमात (साधारणत: ८ जण), विदेशातून परत आलेली एक जमात व एक अन्य जमात असे २४ मुस्लीम मुल्ला मौलवी तसेच मरकजला न गेलेले परंतु, अन्य कारणाने दिल्ली दौरा करून आलेले असे एकुण ३२ जण आज दिवसभरात विविध मुस्लीम वस्त्यांमधून ताब्यात घेऊन कलाग्राममध्ये ठेवण्यात आले आहेत.
जिन्सी पोलिसांनी एका मौलवीला ताब्यात घेऊन त्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. हे मौलवी ६ मार्च रोजी सहरानपूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ११ मार्च रोजी ते शहरात परतले. त्यांना कलाग्राममध्ये ठेवल्यानंतर त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव आला. त्यांना सोडून देण्यात आले आता पुन्हा त्यांना सहा एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच जिन्सी पोलिसांनी काल पासून ९७ जणांना जिल्हारुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या तपासणीसाठी दाखल केले होते.त्या तपासण्या पूर्ण झाल्याची माहिती डाॅ.सुंदर कुलकर्णी यांनी दिली.या ९७ संशयिताचे अहवाल उद्या संध्याकाळ पर्यंत प्राप्त होणार असल्याचे डाॅ.कुलकर्णी म्हणाले.