#CoronaVirus : Aurangabad Update : भोईवाड्यातून कोरोनाचे चार संशयीत ताब्यात

औरंंंगाबाद : भोईवाडा परिसरातील एका मशिदीत गेल्या आठ ते दहा दिवसापासून मुक्कामी असलेल्या चार जणांना पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. भोईवाड्यातून ताब्यात घेतलेल्या चौघांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल करण्यात आले आहे.
भोईवाडा परिसरातील एका मशिदीत गेल्या आठ ते दहा दिवसापासून चार जण मुक्कामी असून त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळ ते मशिदीबाहेर येत नसल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे क्रांतीचौक पोलिसांनी आणि मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने चौघांनाही शुक्रवारी सकाळी ताब्यात घेवून चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही जण हैदराबाद येथील रहिवासी असून ते आठ ते दहा दिवसापुर्वी औरंगाबादला आले होते.
लॉकडाऊन झाल्यानंतर हैदराबादला परत जाण्यासाठी बस अथवा रेल्वे नसल्याने ते भोईवाडा येथील मशिदीत आश्रयाला होते. मशिदीत आश्रयाला असलेल्या पैकी दोघांना सर्दी-खोकल्याचा त्रास असल्याने ते मशिदीबाहेर येत नव्हते. ही बाब पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेवून उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.
भोईवाडा परिसर केला पोलिसांनी सील
भोईवाड्यातील ज्या मशिदीतून कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून चौघांना ताब्यात घेण्यात आले, त्या मशिदीकडे जाणारे रस्ते पोलिसांनी रस्त्यावर बॅरीकेट उभारून सील केले. तसेच या चौघांच्या संपर्कात कोण-कोण आले त्यांची माहिती घेण्याचे काम मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी दिवसभर करीत होते.