Aurangabad : जनता कर्फ्यू नंतर शहरात पहाटे ५ पर्यंत पुन्हा संचारबंदी, पोलीस आयुक्तांचे आदेश

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार रविवारी २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू ऊस्फूर्तपणे सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत पाळण्यात आला. या काळात संपूर्ण शहर कडेकोट बंद होते . रस्ते निर्मनुष्य झालेले होते. बस स्थानक , रेल्वे स्टेशन, विमानतळ पूर्णतः ओस पडले होते . सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे नागरिकांनी सहकुटुंब घराच्या बाहेर येऊन टाळ्या , थाळ्या वाजवून , गो कोरोनाचा जय घोष केला.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले कि , जनता कर्फ्यू संपल्यानंतर पुन्हा रात्री ९ नंतर पहाटे ५ वाजे पर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहतील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे. या आदेशास अनुसरून औरंगाबादचे पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी तसे आदेश जारी केले आहेत.
मात्र संचारबंदीचे हे आदेश पोलिस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा व वाहतूक कोरोना आपत्ती निवारण अधिकारी कर्मचारी व पोलिसांच्या आदेशाने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली असून या कारवाईचा अंमल शहरात सुरु झाला आहे. शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी ध्वनिक्षेपकांद्वारे संचार बंदीची सूचना विविध वसाहतींमध्ये रात्र गस्त घालताना दिली. चौका चौकात बसलेल्या तरुणांच्या टोळक्यांनाही पोलिसांनी आपापल्या घरात जाण्याची सूचना केली.