Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होतील , राज्य सेवा आयोगाचे स्पष्टीकरण

Spread the love

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. १६ ते ३१ मार्च या कालावधीत कोणतीही परीक्षा घेऊ नयेत अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत. मात्र या कालावधीत राज्यसेवा आयोगाची कोणतीही परीक्षा नाही. पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबाबत राज्यसेवा आयोगाने १७ मार्च रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यात म्हटलं आहे की, ‘राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना दि. १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली आहे. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही.’

याबाबत आयोगाने पुढे असे म्हटले आहे की, ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार रविवार दि. ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी झाली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येईल.’ अर्थात ३१ मार्चपर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाविषयी राज्यातील परिस्थितीचा आणि त्यावेळी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने कळवले आहे. त्यानुसार ५ एप्रिलच्या पूर्व परीक्षेबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. मात्र तूर्त तरी ५ एप्रिलला परीक्षा होईल असे मानून उमेदवारांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!