औरंगाबाद शहरातील उद्योजकांवर आयकर खात्याच्या धाडी , कागदपत्रांची छानणी सुरु

औरंगाबाद – शहरातील दोन प्रसिद्ध उद्योग समूहांकडे सुमारे ३०० कोटी रु. अघोषित संपत्ती उघड होण्याची दाट शक्यता आयकर विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. बांधकाम आणि जिनींग प्रेसिंग व अन्य क्षेत्रांत वरील उद्योग काम करतात.
देशातील आणखी ५० ठिकाणी आयकर विभागाने गेल्या दोन दिवसात सर्च आॅपरेशन केले आहे. दस्तऐवज आणि कागदपत्रांची छाननी सुरुच असल्याचे सुत्रांनी सांगितले. ही छाननी संपल्यानंतर अघोषित संपत्तीचा नेमका आकडा लक्षात येईल असेही सुत्रांनी सांगितले. वरील दोन्ही उद्योग समूहांनी कर चुकवेगिरी केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
२१ ते २३ जानेवारी या तीन दिवस ही कारवाई सुरुच होती. या कारवाईत दीडशे पोलिस आणि ३००च्यावर आयकर विभागाच्या कर्मचारी अधिकार्यांचा समावेश होता. औरंगाबादसहित,कोलकत्ता,बंगळूरु, मुंबई, पुणे या ठिकाणच्या वरील दोन्ही उद्योग समूहांच्या कार्यालयांचाही कारवाईत समावेश आहे. वरील कारवाई संदर्भात कमालीची गुप्तता पाळली होती. अघोषित संपत्तीचे सर्व चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.