Aurangabad : प्रदुषण नियंत्रण मंडळातील अधिका-याच्या बदलीसाठी महिलेचे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन

औरंंंगाबाद : प्रदुषण नियंत्रण मंडळातील उपप्रादेशिक अधिकारी प्रदीप वानखेडे यांची औरंगाबाद जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची खातेनिहाय अॅन्टी करप्शन ब्युरोकडून चौकशी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय निवारा परिषदेच्या महिला जिल्हा प्रमुख शालू भोकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) शोलेस्टाईल आंदोलन केले. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीवर चढलेल्या शालू भोकरे यांची समजूत काढुन पोलिसांनी खाली उतरविल्यानंतर हे नाट्य संपले.
एमआयडीसी वाळुज परिसरात असलेल्या अॅल्यमिनीयम भट्यामुळे वाळुज परिसरात राहणा-या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नासाठी वेळोवेळी निवेदन देवूनही प्रदुषण नियंत्रण मंडळातील उपप्रादेशिक अधिकारी प्रदीप वानखेडे यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय निवारा परिषदेच्या महिला जिल्हा प्रमुख शालू भोकरे यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरातील जलकुंभावर चढुन शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक श्रध्दा वायदंडे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे आदींनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. उपमहापौर जंजाळ व पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर शालू भोकरे या सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास खाली उतरल्या.