राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देण्याच्या तयारीत

बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज (मंगळवार) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार देण्याचा निर्णय घेतलं आहे. मंत्रिमंडळात डावलल्याने त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोळंके यांनी मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि माझ्या राजीनाम्याचा संबंध जोडू नये, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र असून भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र विस्तारात डावलले गेल्याने सोळंके नाराज झाले आहेत. सोळंके यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ घेतली असून मंगळवारी दुपारी सोळंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.
‘पीटीआय’शी बोलताना प्रकाश सोळंके यांनी स्वतःच या माहितीला दुजोरा दिला. आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून राजकारणापासून दूर राहण्याचे मी ठरवले आहे, असे सोळंके यांनी स्पष्ट केले. मी माझ्या पक्षातील कोणत्याही नेत्यावर आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे माझा राजीनामा सोपवणार आहे. या राजीनाम्याचा मंत्रिमंडळ विस्ताराशी कोणताही संबंध नाही, असा दावाही सोळंके यांनी केला.