गळफास घेवून विद्यार्थ्याची आत्महत्या

मानसिक आजाराला कंटाळून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी गारखेडा परिसरातील गुरूदत्तनगर येथे समोर आली. नरेंद्र शिवाजी मोरे (१७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
नरेंद्र मोरे हा एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याला मानसिक आजार असल्याने एका डॉक्टरकडे उपचार सुरू होते. आई-वडिल त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवून असत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान तो महाविद्यालयातून घरी आला. जेवण करून झोप येत असल्याचे सांगून बेडरुममध्ये गेला. दुपारी चार वाजेच्या दरम्यान वडील दुकानावर जाण्यासाठी निघाले असता त्यांनी मुलाला बघावे म्हणून खिडकीतून डोकावले. त्यावेळी साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. वडिलांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. पुतण्याच्या मदतीने नरेंद्रला फासावरून उतरविले. त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ धर्मा जाधव करीत आहेत.