Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी आंदोलनाला हिंसक वळण , मराठवाड्यात बीड , परभणी , हिंगोली , कळमनुरीत दगडफेक , पोलिसांचा लाठीचार्ज

Spread the love

केंद्राने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी बाबत राजधानी दिल्ली आणि पूर्वोत्तरेतल्या राज्यांमध्ये असंतोष उफाळून आल्यानंतर त्याचे  लोण आता महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातही पोहोचले असून आज मराठवाड्यातील बीड , परभणी , हिंगोली आणि कळमनुरी शहरात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान औरंगाबादमध्येही या कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

मुंबई, कोल्हापूरनंतर  हिंगोलीत कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. कळमनुरी येथेही बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान काही युवकांनी भाजी मंडीजवळ जुना बस स्टँड परिसरात तीन बसवर दगडफेक करून बसची जाळपोळ करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाता आता महाराष्ट्रातही वातावरण तापत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झले आहे.

हिंगोलीत बस तर परभणीत अग्निशमन दलाची गाडी फोडली

हिंगोलीत आंदोलकांनी गाड्या फोडल्या आणि जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये (एम.एच 20 बी एल 1693) या बसवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक बस वाहक आणि एक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अद्याप कुणाला अटक झालेली नाही. परभणीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे वृत्त असून आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली. या दगडफेकीत काही नागरिक व पोलीस जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहनांवर व दुकानांवर झालेल्या दगडफेकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला. हिंगोलीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

बीड मध्ये लाठीचार्ज 

दरम्यान बीड शहरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बंद हिंसक वळण लागलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस कुमकही वाढवण्यात आली आहे.

बीड शहरातील बशीर गंज, भाजीमंडई, राजुरी वेस, डीसीसी बँकेत परिसरातही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाली आहे. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एनआरसी-सीएए कायद्याविरोधात शुक्रवारी बीड बंदची हाक देण्यात आली होती. या संदर्भात दुपार बंदला गालबोट लागले. जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक दगडफेक केली. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेऊन आहेत.

कळमनुरी येथे प्रचंड दगडफेक

दुपारी कळमनुरी येथे प्रदर्शन कर्त्याकडून अचानक रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोकोनंतर जमावाने अचानक दगडफेक केली. समाजकंटकांनी वाहने, पोलिस आणि दुकानांवर प्रचंड दगडफेक केली.  कळमनुरीमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळमनुरी हा संवेदनशील असतानाही पोलिस बंदोबस्त अत्यंत तोकडा होता. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!