Aurangabad Crime : लाचेच्या मागणीप्रकरणी पोलिसाविरुध्द गुन्हा

नायट्रोझेन गोळ्यांच्या प्रकरणात भाच्याला अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करणा-या पोलिस शिपायाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम फैय्याज शेख (रा. गल्ली क्र. ३, बेरीबाग, हर्सुल) असे त्याचे नाव आहे.
गेल्या महिनाभरापुर्वी मुकुंदवाडी पोलिसांनी नशेच्या व गर्भपाताच्या गोळ्या विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एकाला सिडको बसस्थानक चौकातील दिपाली हॉटेलजवळ पकडले होते. यावेळी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तक्रारदाराच्या भाच्याला अटक न करण्यासाठी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपाई अस्लम शेख याने तीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरुन तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा पंचांंमार्फत करण्यात आली. तडजोडीअंती अस्लम शेख याने वीस हजाराची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, याप्रकरणी सोमवारी दुपारी तक्रारदाराच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अस्लम शेखविरुध्द लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे करत आहेत.