Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CAB वरून पूर्वोत्तर राज्यात हिंसाचार सुरूच , मागणीनुसार कायद्यात बदल करण्याचे अमित शहा यांचे जाहीर सभेत संकेत, काँग्रेसवर हिंसा भडकावल्याचा आरोप

Spread the love

नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेत पास झाल्यानंतर आसामसह देशातील पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये विरोध सुरू झाला असून आसाममधील परिस्थिती नियंत्रणात असून समाजकंटकांना आवर घातला जाईल असे आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी म्हटले आहे. गुवाहाटीमध्ये लागू केलेली जमावबंदी शिथील केल्यानंतर लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध काँग्रेस पक्षाकडून हिंसा पसरवली जात असल्याचा असा थेट आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. कुणालाही या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे सांगून ते म्हणाले कि, या चर्चेनंतर या  कायद्यात काही बदल केले जाऊ शकतात.

झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना शहा यांनी हे संकेत दिले आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत असे आपल्याला सांगितल्याचे अमित शहा यांनी सभेत बोलताना सांगितले. संगमा यांना ख्रिसमसनंतर आपली भेट घ्यावी असेही सांगितल्याचे शहा म्हणाले. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का याचा विचार केला जाऊ शकतो असे शहा म्हणाले.

आम्ही नागरिकत्व संशोधन विधेयक आणल्यामुळे काँग्रेस पोटात दुखत आहे. या विरोधात काँग्रेस हिंसा पसरवण्याचे काम करत आहे, असेही शहा म्हणाले. या कायद्यामुळे ईशान्य भारतातील संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असेही शहा म्हणाले. या पूर्वी लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे वक्तल्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. शाह यांचे नागरिकत्व कायद्यावरील हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकत्व कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

परिस्थिती नियंत्रणात होत असल्याचा दावा 

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर विरोध प्रदर्शन सुरु असले तरी आसाममध्ये परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. गुवाहाटी शहरात ब्रॉडबँड सेवा सुरु झाली असली तरी मोबाइल इंटरनेट मात्र अजूनही बंदच आहे. गुवाहाटी आणि दिब्रुगडमध्ये काही तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

गुवाहाटी शहरात सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तर दिब्रुगडमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पोलीस लाऊडस्पीकरवरुन लोकांना संचारबंदी शिथिल केल्याची माहिती देत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरित्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर हा हिंसेचा आगडोंब उसळला आहे. गुवाहाटी शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण तिनसुकिया, दिब्रुगड आणि जोरहाट या अप्पर आसामच्या भागामध्ये तणाव असून तिथे हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगलाच्या हावडा शहरात कॅब आणि एनआरसी विरोधकांनी डोमजूर सालापजवळ टायर जाळून महामार्ग रोखला. पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स या भागात तैनात करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आंदोलकांनी शनिवारी सकाळी एका स्टेशनवर तोडफोड केली. शुक्रवारी आंदोलकांनी मुर्शिदाबादमध्येच एका रेल्वे स्टेशनची तोडफोड केली होती. पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिकेवरही हल्ला केला होता. काही पोलीसही जखमी झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!