Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हुतात्मा स्मारकाचे दर्शन , छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांना अभिवादन करून उद्धव ठाकरेंनी स्वीकारली मुख्यमंत्रीपदाची सूत्रे…

Spread the love

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर हजारोंच्या साक्षीने  शुक्रवारी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन पदाचा कार्यभार स्वीकारला. पदाची सूत्रे  हातात घेण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते मंत्रालयात पोहोचले. त्यांच्या आगमनाची मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची प्रचंड झुंबड उडाली होती. सहाव्या मजल्यावर जाण्याआधी उद्धव यांनी तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते सहाव्या मजल्यावर गेले.

मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर उद्धव यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व नितीन राऊत  आदी  मंत्री व आमदारांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे हंगामी अधिवेशन उद्यापासून सुरू होण्याची शक्यता असून, बहुमत चाचणीपूर्वी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. वास्तविक पाहता याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती. त्यांनीच  राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली होती.

महाराष्ट्र विधानसभेचं दोन दिवसांचं हंगामी अधिवेशन उद्यापासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठी  ३ डिसेंबरची तारीख दिलेली असली तरी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार विधानसभेतउद्याच बहुमत सिद्ध करणार असल्याचं उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली असली तरी उद्धव यांचं सरकार उद्या बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे, असे  शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही म्हटले आहे. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला १६२ आमदारांचा पाठिंबा होता, आता हा आकडा १७० वर पोहोचला आहे. तिन्ही पक्ष मिळून पाच वर्षे उत्तम कामगिरी करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!