Aurangabad Crime : विधी संघर्षग्रस्त मुलाच्या मदतीने चो-या करणारा बाप जेरबंद, ६ लाख १८ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : विधी संघर्षग्रस्त मुलाच्या मदतीने घरफोडी करणा-या बापाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत जेरबंद केले. रंगनाथ सुब्रहमण्यम कस्तुरे (रा.जोगेश्वरी मंदिराजवळ, कातपुर, ता.पैठण) असे मुलाच्या मदतीने चो-या करणा-या बापाचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ६ लाख १८ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी शनिवारी (दि.२३) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथ कस्तुरे हा आपल्या १५ वर्षीय मुलाच्या मदतीने घरफोड्या करीत होता. रंगनाथ कस्तूरे याने कातपुर शिवारातील रहिवासी मुकुंद शांताराम जोशी (वय ५२) यांच्या घरी चोरी करून ३ लाख ७० हजार ५५० रूपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. चोरीचा माल विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे , उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, जमादार संजय काळे, प्रमोद खांदेभराड, राहुल पगारे आदींच्या पथकाने सापळा रचून कस्तूरे याला अटक केली.