Politics of Maharashtra : सेना, काॅंग्रेस -राष्ट्रवादीचे सरकार पाच नव्हे १५ वर्ष टिकेल : जयंत पाटील

महाराष्ट्रात नव्याने येऊ घातलेले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार अधिक काळ भक्कमपणे टिकावं यासाठीच या चर्चा सुरू असून भक्कम पायावर उभं राहिलेलं सरकार पाच वर्षेच काय पुढची १५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आज व्यक्त केला.
हो नाही म्हणता म्हणता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्या. दिल्लीत दोन दिवस चाललेलं हे बैठकीचं वादळ संपल्यानंतर या प्रदीर्घ चर्चेच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी या चर्चेचे महत्त्व आणि गरज का होती हे सांगण्याचा प्रयत्न केला.
राज्याला स्थिर सरकार मिळावं हा प्रामाणिक उद्देश या सर्वामागे आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या नव्या सत्ता समीकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येत असताना या तिन्ही पक्षांत समन्वय महत्त्वाचा असेल. आम्हाला आघाडीचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा पक्ष आमच्यासोबत जोडला जात आहे. त्यांना सोबत घेऊन आता आम्हाला समन्वय साधावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष मिळून समन्वय समिती बनवून पुढे जाऊ, असेही पाटील यांनी पुढे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता आताच त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले कि, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. दिल्लीतील चर्चा संपल्यानंतर आता प्रथम निवडणूकपूर्व आघाडीतील अन्य घटक पक्षांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. या संयुक्त बैठकीनंतर महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही जाहीरपणे आमची भूमिका मांडणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.