Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत महंमद खडस यांचे निधन

Spread the love

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते, विचारवंत महमद खडस यांचं आज मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फाफा उर्फ फातिमा खडस आणि चिरंजीव समर खडस असा परिवार आहे. महमद खडस यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा कट्टर पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

महमद खडस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज रात्री चुनाभट्टीच्या एव्हरार्ड नगर येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या चिपळूण येथे त्यांचा दफनविधी होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक समर खडस यांचे ते वडील होते. महमद खडस हे समाजवादी विचारसरणीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते होते. वयाच्या १३ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजवादी चळवळीत स्वत:ला झोकून दिलं होतं. आणीबाणीच्या काळात त्यांनी १४ महिने तुरुंगवासही भोगला होता. त्यानंतर त्यांनी समता आंदोलनास सुरुवात केली. दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळीतील आंदोलनात त्यांनी सक्रिय काम केले होते. सोबतच मुस्लिम समाजातील मागास घटकांच्या कारणांचा शोध घेऊन त्यांनी सवित्सर अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लिम तलाकपीडित महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेटाने बाजू मांडली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीचे ते खजिनदार होते.

मुंबईतील सफाई कामगारांच्या वेदना चव्हाट्यावर आणण्याचं कामही त्यांनी केलं. खडस आणि अरुण ठाकूर यांनी ‘नरक सफाईची गोष्ट’ हे पुस्तक लिहिलं होतं. प्रसिद्ध विचारवंत, लेखक य. दि. फडके यांनी ‘स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचा सहभाग’ हे पुस्तक लिहिलं होतं. महमद खडस यांनी या पुस्तकासाठी विशेष मेहनत घेतली होती.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्यात त्यांनी नेहमी सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्र सेवा दलात ते काही काळ होते, पण युवकांना सामाजिक प्रश्नांचा ठोस कार्यक्रम द्यावा या हेतूने त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत समता आंदोलन नावाची वेगळी संघटना उभारली होती. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे सामाजिक लढे, आंदोलने याविषयी त्यांना कमालीची आस्था होती. १९८० च्या दशकात पुण्यातील विषमता निर्मूलन परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबईतील अपना बाजारच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरीत झालेल्यांना त्यांनी मदत केली. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.

महमदभाईंच्या निधनाचे वृत समजताच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाजप नेते अॅड. आशिष शेलार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार कपिल पाटील, रिपब्लिकन चळवळीतील गौतम सोनवणे, ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू यांनी निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!