मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , दिवाकर रावते यांनी घेतली राज्यपालांची भेट , शिवसेना सत्तास्थापनेसाठी हातघाईवर

दिवाळीनंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेची घाई झाली असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच शिवसेनेने भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट करीत इतना सन्नाटा क्यूँ है भाई म्हणत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सरकारच्या धोरणामुळेच दिवाळीची रौनक गेल्याचे सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे . या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या दिशेने आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. आज सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राजभवनात येऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी सदेखील राजभवनात पोहोचणार होते. दोघेही वेगवेगळ्या वेळी राजभवनात जाणार असल्याने चर्चांना ऊत आला होता. मात्र, या भेटी कोणत्याही राजकीय कारणांसाठी नसून आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे फडणवीस आणि रावते यांनी सांगितले.
या संबधीचे लेट नाईट वृत्त महानायक ऑनलाईनने आधीच टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने दिले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते या दोघांनीही राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान हि दिवाळी भेट असल्याचे रावते यांनी आज सांगितले.
दिवाकर रावते राज्यपालांना भेटून बाहेर येताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले मात्र आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मी मुंबईचा महापौर होतो तेव्हापासून म्हणजे १९९३ पासून हा दिवाळीचा शिरस्ता पाळतोय. दरवर्षी पाडव्यादिवशी मी राज्यपालांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. ‘