Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बातमी मोठी , दिवाळी भेट छोटी : एस टी कर्मचाऱ्यांना २५०० तर अधिकाऱ्यांना ५००० ची दिवाळी भेट

Spread the love

दिवाळीच्या सणाला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. एसटीतील तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. गेली ४ वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येत आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपये अग्रिम देण्यात आला आहे. तर यंदा एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे एक लाख १० हजार कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे २५०० व ५००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

यासंदर्भात एसटीच्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी दीवाकर रावते यांना दूरध्वनी करुन मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती  केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने रावते यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देण्यात येत असलेला ३ टक्के महागाई भत्ता १ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनामध्ये ही ३ टक्के महागाई भत्ता देण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय पुढे घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एसटी महामंडळातर्फे २४ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे ३५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!