ठाणे : ईव्हीएम मुर्दाबाद म्हणत रिपाइं कार्यकर्त्याने फेकली शाई , मतदान केंद्रात उडालं गोंधळ !!

मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असताना त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.
सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवले आहे. मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार, असं मत सुनिल खांबे यांनी व्यक्त केलं. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असंही आवाहन केलं. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
सुनिल खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आले. मात्र, त्यांनी अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाईची बॉटल हिसकावून ती ईव्हीएम कक्षावर फेकली. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले.