Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Updates : वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर नांदेड , जालना आणि सोलापूर जिल्यात हल्ले, तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी

Spread the love

नांदेड , जालना आणि सोलापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे . नांदेड  जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघात, अंतापुर चैनपुर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर  जालना आणि सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणांची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी व्यक्तींना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य महिला प्रमुख रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यात पुन्हा लढत आहे. पण वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवार उभे केल्याने निवडणुकीला तिरंगी स्वरुप प्राप्त झाले. वंचितने प्रा.रामचंद्र भरांडे यांना उमेदवारी दिल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान ‘वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत सुरू असलेल्या घराणेशाहीला फाटा दिला आणि ज्यांना कधी ह्या लोकशाही व्यवस्थेत स्थान मिळत नाही अशा वंचित समूहातील व्यक्तींना उमेदवारी दिली. यामुळे जिल्हा आणि राज्यातील राजकारण लोकसभा निवडणुकीत ढवळून निघालं आता विधासभा निवडणुकीत देखील प्रस्थापित घराणेशाही वाल्या उमेदवार लोकांनी याचा धसका घेतला म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ले करायला सुरुवात केली आहे’, असं वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात वंचितचे उमेदवार अतुल खूपसे पाटील यांच्या पत्नी आणि पोलिंग एजंट यांच्यावर आज सकाळी हल्ला केला गेला. यात खूपसे पाटील यांच्या पत्नीच्या हाताला तर २ कार्यकर्त्यांना डोक्याला जबर मार लागला असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे जालना शहरातील वंचितचे उमेदवार अशोक खरात यांच्यावर आज सकाळी हल्ला केला गेला. यात त्यांचा  कार्यकर्ता जबर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हे दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!