Mumbai Crime : ५०० रुपयातले १०० रुपये परत देत नाही म्हणून त्याने केला वेश्येचा खून

केवळ शंभर रुपयांसाठी कामाठीपुऱ्यात एका ग्राहकाने वेश्येची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने केवळ शंभर रुपयांसाठी वेश्येवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात या वेश्येच्या बचावासाठी आलेला एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर जे.जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून त्याच्या विरुद्ध नागपाडा पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र कुमार (वय-२८) असे या मारेकरीचे नाव आहे. तो कॅटरिंगचे काम करतो. जितेंद्र रविवारी रात्री नागपाड्यातील कामाठीपुरा येथे आला होता. एका वेश्यासोबत त्याचे ४०० रुपयांत ठरले होते. खोलीतून बाहेर पडताना त्याने तिला ५०० रुपयांची नोट दिली. त्याने उरलेले १०० रुपये तिला मागितले. मात्र, तिने ते देण्यास नकार दिला. त्यावरून दोघांत बाचाबाची झाली. या वादातून जितेंद्रने सोबत असलेल्या चाकूने या वेश्येच्या छाती आणि पोटावर सपासप केला. तिच्या बचावासाठी एक जण पुढे आला. त्याच्यावरही जितेंद्रने चाकूने वार केले.
दोघांना तातडीने जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ३० वर्षीय वेश्येला मृत घोषित केले. शहाबाज मर्चंट असे जखमीचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जितेंद्रवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली आहे.