Aurangabad Crime : तलवार, चाकु, गुप्तीसह तिघांना अटक लष्कर, पोलिसाच्या मुलांचा आरोपीत समावेश

दोन दिवसांपुर्वी तलवारीने हल्ला चढविलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या सिडको पोलिसांच्या हाती तिघांसह पाच शस्त्रे लागली. यात दोन तलवारी, एक गुप्ती आणि दोन चाकु पोलिसांनी जप्त केले. याशिवाय कार हस्तगत करण्यात आली आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त जवानाच्या व पोलिसाच्या मुलाचा समावेश आहे. हे तिघेही उच्चशिक्षित तरुण आहेत. यातील पोलिसाच्या एका मुलाला २०१५ मध्ये अमरावतीतील डॉ. चित्रा डकरे यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर आता धाकट्याला शस्त्रांसह पकडण्यात आले आहे.
दोन दिवसांपुर्वी हडकोतील सौभाग्य मंगल कार्यालयाजवळ तरुणावर चाकुहल्ला चढविण्यात आला होता. याप्रकरणाचा तपासा करत असताना सिडको पोलिसांनी कृष्णा शिंदे या तरुणाला अटक केली होती. तर त्याचा साथीदार अमोल गणपत लहाने (२१, रा. मयुरपार्क, शिवेश्वर कॉलनी) याचा शोध सुरू होता. दरम्यान, १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अमोल लहाने, पोलिस पुत्र योगेश नारायण घुगे (२०, रा. शिवनेरी कॉलनी, सिडको) आणि प्रफुल्ल नामदेव बोरसे (१९, रा. छत्रपती हॉलच्या पाठीमागे, कोलठाणवाडी, हर्सुल) हे तिघे शस्त्रांची विक्री करण्यासाठी एमजीएम कॅम्पसजवळ असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, स्वप्निल रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे, लाल खाँ पठाण यांनी धाव घेतली. तिघांना कारसह (एमएच-२०-सीएस-२४३६) पकडत त्यातील दोन तलवारी, एक गुप्ती आणि दोन चाकु पोलिसांनी हस्तगत केले.
……..
तिघेही उच्चशिक्षित तरुण…..
अमोल लहाने याचे वडील लष्करातून निवृत्त झालेले आहेत. सध्या ते एका ठिकाणी सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. तर योगेश घुगे याचे वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. प्रफुल्ल बोरसे याने वडीलांना न सांगता कार आणली होती. हे तिघेही बारावी ते प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. या तिघांनी नांदेडहून शस्त्रे विक्रीसाठी आणली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
……..
पोलिसाचा दुसरा मुलगाही आरोपी….
पोलिस कर्मचारी नारायण घुगे यांचा थोरला मुलगा अमोल याला २०१५ मध्ये अमरावतीतील डॉ. चित्रा डकरे यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अमोल व त्याच्या साथीदाराने डॉ. डकरे यांचा दोरीने गळा आवळुन चाकुने तो कापला होता. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरुन गेले होते. या घटनेनंतर आता त्यांचा धाकटा मुलगा योगेश देखील शस्त्र प्रकरणात आरोपी झाला आहे. अमोल घुगे याने २८ डिसेंबर २०१७ आकाश बिडवे (रा. शास्त्रीनगर) याच्यावर चाकुने हल्ला केला होता.