मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत , मी पाकिस्तान धार्जिणा आहे तर पद्म विभूषण पुरस्कार दिला कशाला ? : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळविल्याचे घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी पाकिस्तानचा समर्थक आहे. असे असेल तर मला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पद्म विभूषण या सन्मान कशाला दिला. CNN-न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच सुरुवात झाली असून प्रत्येक नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहे. आणखी काही दिवसात प्रचाराचा हा कलगी तुरा चांगलाच रंगणार आहे. सध्या शरद पवार यांचे वक्तव्य आणि सभा चांगल्याच गाजत आहेत . दरम्यान त्यांनी CNN-न्यूज 18 ला दिलेली मुलाखत अशीच गाजत आहे. या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे.
नाशिक येथे भाजपच्या महाजनादेश यात्राच्या समारोप सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, असे मोदी म्हणाले होते.
मोदींना पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा राखता आली नाही. पंतप्रधान ही एक संस्था आहे. या संस्थेकडे माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. मला आनंद झाला असता तर त्यांनी माझे वाक्य नीट ऐकून स्वत:चे वक्तव्य केले असते. इतक नव्हे तर त्यांनी हा विचार करायला हवा होता की, मला जर पाकिस्तान आवडत असता तर त्यांच्या सरकारने मला पद्म विभूषण सन्मानाने का गौरविले. या सन्मानाचा अर्थ असाच आहे की मी देशहितासाठी काही तरी काम केले आहे. पण एका बाजूला सन्मान करायचा आणि दुसऱ्या बाजूला असे सांगायचे की मला पाकिस्तान आवडतो. अशा पद्धतीचा दुतोडी व्यवहार देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही, असे पवार म्हणाले.