मुंबई आरे वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्या २९ आंदोलकांना जमीन, सर्वोच्च न्यायालयात उद्याच सुनावणी , स्वतःच घेतली दखल

आरे मेट्रो कारशेड प्रकरणात पर्यावरणप्रेमींचे आरे मधील वृक्षतोड थांबविण्यासाठी आंदोलन सुरूच असून हे आंदोलन करताना अटक करण्यात आलेल्या २९ आंदोलनकर्त्यांची आज न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली . पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर कोर्टाने जनहितार्थ सुमोटो याचिका दाखल करून घेतली असून या याचिकेवर उद्या सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी विशेष पीठ गठित करण्यात आले असून त्यापुढे याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ५५ जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली तत्काळ याचिका आज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे.
शनिवारी सकाळपासून गोरेगाव हायवेपासूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या भागात कलम १४४ लावून लोकांना आरे परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. मुंबई ‘मेट्रो ३’चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील २ हजार ६५६ झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसेच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तिथे दाद मागा, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले होते. रात्रीच्या सुमारास झाडे तोडण्यात येत आहे. ही बातमी पसरताच रात्रीपासून मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी या भागात धाव घेतली. आज सकाळी या ठिकाणचे वातावरण तापले. पोलिसांनी या ठिकाणी पोहोचणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चौकशी केली.
उच्च न्यायालयाने मेट्रो ३ कारशेड संदर्भात दिलेल्या निकालाला शिवसेना आव्हान देणार असून आरे वृक्षतोड ही नियमबाह्य असून याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे. रात्रीच्या अंधारात केलेली झाडांची कत्तल नियमबाह्य आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत हातात नसताना ही वृक्षतोड सुरु केली गेली, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.
‘आरे’ प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनाही अटक, निषेधार्थ कार्यकर्ते रस्त्यावर