Aurangabad Crime : लष्करातील जवानाची डेटिंगच्या नावाखाली फसवणूक , साडेचार लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस

वेगवेगळ्या मोबाईलवरुन सहा जणांनी केले संभाषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील जवानाला डेटिंगसाठी मुली पुरविण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन संभाषण साधत साडेचार लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिया, अनिता, रश्मी, आरती, अभिजीत व संजय श्रीवास्तव अशी त्यांची बनावट नावे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या एरंडोल तालुक्यामधील दिनेश (नाव बदलले आहे.) हे लष्करातील जवान आहेत. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आलेले आहेत. ते सतरा वर्षांपासून राजस्थानातील कोटा येथे नोकरीला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर मिस कॉल आला. त्यामुळे त्यांनी साडेबाराच्या सुमारास मिस कॉल आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा रश्मी नावाची महिला त्यांच्याशी बोलली. यावेळी तिने आपण आॅन लाईन इंडिया डेटिंग २४ डॉट कॉम इन या कंपनीतून बोलत आहे. आमच्या साईटवर तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपुर मुली आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला डेटिंगकरिता मुलींची भेट घालून देऊ शकतो. त्यावर दिनेश यांनी तिला नंतर कळवतो असे सांगितले. त्यानंतर २0 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना पुन्हा सिया नावाच्या तरुणीने फोन केला. तिने देखील रश्मी सारखीच माहिती दिली. तसेच आमच्या साईटवर तुमची एक प्रोफाईल तयार करा. त्यावर दिनेश यांनी मुली कोठे भेटतील असे विचारताच तिने मुली औरंगाबादला भेटण्यासाठी बोलवायच्या असतील तर तुम्हाला बँक खात्यात बारा हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यावरुन दिनेश यांनी खात्यावर रक्कम भरली. त्यानंतर सिया नावाच्या तरुणीने त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली. त्यामुळे त्यांनी आधारकार्ड व एक फोटो तिला व्हॉटसअप केला. पुढे अभिजीत नावाच्या तरुणाने त्यांना फोन करुन तुमचे प्रोफाईल तयार करण्यासाठी अडचण येत आहे. त्याकरिता तुम्हाला आणखी ४५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी मित्र संदीप इक्का (रा. झारखंड) याला वीस हजार रुपये जमा करायला सांगितले. तर दिनेश यांनी उर्वरीत २५ हजार रुपये बँक खात्यात जमा केले. यानंतर सिया हिने अनिता नावाच्या मुलीचा मोबाईल क्रमांक देत ती तुम्हाला भेटेल असे सांगितले.
वेगवेगळे कारण सांगून पैसे उकळले….
दिनेश यांनी अनिताशी संपर्क साधल्यावर तिने आपण मुळची दिल्ली येथील आहे. सध्या मुकुंदवाडी भागात राहते. याच कंपनीमध्ये प्रोफाईल असून, आपले देखील पैसे कंपनीत अडकल्याचे सांगितले. याच दरम्यान, तिने तब्येत खराब असल्याने आज भेट होऊ शकत नाही. पण तुमच्यासोबत डेटिंगवर आल्यानंतर माझे पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यानंतर रश्मी व आरती यांनी फोनवर संपर्क साधून नेहमी वेळ मारुन नेली. तसेच वारंवार वेगवेगळी कारणे पुढे करुन सहा जणांनी दिनेश यांच्याकडून चार लाख ४७ हजार रुपये उकळले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर ४ आॅक्टोबर रोजी दिनेश यांनी पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत.