Aurangabad Crime : पुलाच्या बांधकामाची बळकावलेली यंत्र सामुग्री राजस्थानमधून हस्तगत, पिता-पुत्रांविरुध्द जिन्सीत गुन्हा दाखल

बेनगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुपरवायझर पिता-पुत्राला पुरवठा केलेली यंत्र सामुग्री गुंडांच्या मदतीने बळकावण्यात आली होती. ही यंत्र सामुग्री दोन महिन्यानंतर हस्तगत करण्यात जिन्सी पोलिसांना यश आले आहे. तब्बल ५१ लाखांची यंत्र सामुग्री पोलिसांनी राजस्थानातून जप्त केली. २ आॅक्टोबर रोजी ही सामुग्री शहरात आणण्यात आली.
जालना रोडवरील अहिंसानगरात राहणारे महेश विश्वनाथ घुगे (३६) आणि त्यांचे वडील शासकीय कंत्राटदार आहेत. महाराष्ट्र, राजस्थान व गोवा या राज्यातील पाटबंधारे विभागाची धरणे, कॅनॉल व पुलाचे ते १९८४ पासून बांधकामे करतात. फेब्रुवारी २0१५ मध्ये राजस्थान मधील बेनगंगा नदीवरील नलका नाला बारान येथील पुलाचे काम त्यांना मिळाले होते. त्या कामाचा कार्यारंभ २३ फेब्रुवारी २0१५ रोजी करण्यात आला होता. ४ मार्च २0१५ रोजी कामाला सुरूवात करण्यात आली. हे काम परराज्यात असल्याने घुगे पिता-पुत्रांनी तेथील कैलासचंद्र दादीज व त्याचा मुलगा शरद दादीज यांना सुपरवायझर म्हणून नेमले होते.
या कामाची किंमत तीन कोटी पंधरा लाख रुपये होती. त्यापैकी दोन कोटी ८२ लाख ५७ हजार रुपये घुगे यांनी कामाचे व मजुराचे वेतन म्हणून शरद दादीजच्या बँक खात्यावर जमा केले होते. तर त्याची पत्नी वर्षा हिच्या खात्यावर दहा लाख रुपये मजूरांचे वेतन व इतर कामासाठी पाठवले होते. मात्र, या पैशांचा दोघांनी कोणताही हिशेब घुगे यांना दिला नाही. तसेच कामाच्या ठिकाणी असलेली यंत्र सामुग्री अहिंसानगरातून घेऊन गेले. त्यात हायवा ट्रक, बोलेरो जीप, स्विंसींग मिटर प्लॉट, जनरेटर, काँक्रीट मिस्कर, सेंट्रिंग प्लेट व जॅक अशी ५६ लाखांची यंत्र सामुग्री नेली. काम पुर्ण झाल्यानंतर कामाची अंतिम देयके संबंधीत कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यानंतर यंत्रणा व साहित्य घेण्यासाठी आॅक्टोबर २0१८ मध्ये घुगे शरद दादीज याच्याकडे गेले. तेव्हा त्याने व त्याच्या वडिलाने स्थानिक गुंडांना हाताशी धरुन घुगे यांना पिटाळुन लावले. तेव्हापासून ५६ लाखांची यंत्र सामुग्री त्यांच्याकडे होती.
याशिवाय त्यांनी बनावट स्वाक्ष-या करुन धनादेश वटविण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी २0 आॅगस्ट रोजी घुगे यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते हे करत आहे. गिते यांनी सहकारी पोलिस नाईक बाळु थोरात, शिपाई प्रविण टेकले, कैलास चव्हाण यांच्यासह २९ सप्टेंबर रोजी राजस्थानातील बारान जिल्हा गाठला. तेथे यंत्र सामुग्रीचा शोध घेऊन ती २ आॅक्टोबर रोजी शहरात आणण्यात आली.