Aurangabad Crime : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील वृध्द महिलांना गंडविणारा भामटा अटकेत

मुस्लिम महिलांनाच करायचा टार्गेट । कर्जाचे आमिष दाखवून लांबवायचा दागिने
मुस्लिम वृध्द महिलांना टार्गेट करुन त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत बचत गटाचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांचे दागिने लांबविणाºया भामट्याला २० सप्टेंबर रोजी सायंकाळी नंदुरबार पोलिसांनी जवाहरनगर पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. या भामट्याविरुध्द विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह बीडमध्ये गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे त्याला यापुर्वी फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलांचे दागिने लुबाडल्यानंतर मिळालेला पैसे तो जुगारात उडवायचा अशी माहितीही नंदुरबार पोलिसांनी दिली. आसिफ खान अहेमद खान (४९, रा. कटकट गेट, जिन्सी) असे त्याचे नाव आहे.
नंदुरबारच्या नवापुरमधील एका वृध्द महिलेला २८ मे २0१९ रोजी त्याने टार्गेट केले. यावेळी त्याने तिच्याशी ओळख वाढवून कुटुंबियांची देखील माहिती गोळा केली. त्यानंतर त्याने शासकीय योजनेतून बचत गटाचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, तो वृध्देला नंदुरबारच्या च्या तहसील कार्यालयात घेऊन गेला. तेथे नेल्यावर महिलेला अंगावरील सोन्याचे दागिने एका पिशवीत काढून ठेवायला सांगितले. पुढे त्याने तहसील कार्यालयात फेरफटका मारला. त्यानंतर एक फॉर्म आणून त्याच्यावर वृध्देच्या सह्या घेतल्या. वृध्देने सह्या केल्यानंतर तिला हा फॉर्म तुम्ही तहसीलदारांना नेऊन द्या. तोपर्यंत सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सांभाळतो असे सांगत तेथून पळ काढला. फसवणूक झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेने उपनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
…..
सीसी टिव्हीचा धाक दाखवायचा…….
कर्जाचे आमिष दाखवून तहसील कार्यालयात नेलेल्या महिलांना तो परिसरातील सीसी टिव्ही असल्याने अंगावरील दागिने पाहून तहसीलदार कर्ज मंजूर करत नाही असा धाक दाखवायचा. त्यामुळे वृध्द महिला अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवायच्या. त्यानंतर आसिफ खान महिलांच्या हातात फॉर्म ठेऊन त्यांना तो तहसीलदाराला नेऊन द्यायचे सांगायचा. त्यांच्याजवळची दागिन्यांची पिशवी स्वत:जवळ ठेऊन घेत पळ काढायचा.
……..
आसिफ सराईत गुन्हेगार…..
आसिफ याच्याविरुध्द नंदुरबार, पाचोरा, चंद्रपुर, निफाड, बुलढाणा, जळगाव, वाशिम आणि बीड जिल्ह््यातील धारुर येथे देखील अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो केवळ ४0 हजारापर्यंतचे दागिने लुबाडायचा. जेणे करुन त्याच्याविरुध्द पोलिसात तक्रार दाखल होणार नाही. किरकोळ दागिने लुबाडल्यामुळे तक्रार देण्यासाठी देखील महिला पोलिसांकडे जात नसल्याचे त्याला माहिती होते.
……..
दोन पोलिस ठाण्यांची मदत……
आसिफ जिन्सी परिसरातील कटकट गेट येथे राहत असल्याची माहिती नंदुरबार पोलिस ठाण्याचे जमादार प्रदिपसिंग राजपुत यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी सुरूवातीला जिन्सी पोलिसांशी संपर्क केला. जिन्सी पोलिसांनी देखील आसिफचा बराच शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, सायंकाळी गारखेडा परिसरातील काबरानगरात त्याला उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत पाचोळे, जमादार राजपुत, कृष्णा बो-हाडे, माणिक हिवाळे, सुखदेव जाधव आणि समाधान काळे यांनी पकडले.