Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha : भाजप- सेना महायुतीत जागा वाटपावरून घमासान , भाजपचा वाटा सेनेला मंजूर होईना…

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का ? यावर अजूनही दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला-भाजप ११५ ते १२० मतदारसंघच देणार. यावरून मोठा वाद सुरु आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत १३५ पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असताना भाजपने शिवसेनेला १२० जागांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे भाजपने स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या या पार्श्वभूमिवर रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना नेते, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. याच बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायचं का? की युतीत जागावाटपात तडजोड करून लढायचं. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध  माहितीनुसार, शिवसेना भाजपसोबत जागावाटपात तडजोड करून युती करणारच असल्याची माहिती मिळते आहे. जर शिवसेनेच्या वाट्याला भाजप पेक्षा कमी जागा येत असतील तर त्या जागा निवडण्याचा अधिकार शिवसेनेलाच हवा.  युतीवर भाजप आणि शिवसेना सकारात्मक आहे. लवकरत उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करतील असं शिवसेना नेता निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. युतीवर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यावर कोणी विश्वास ठेऊ नका. सगळ्यांनी सबुरी ठेवा असं म्हणत त्यांनी युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, विधानसभेसाठी सर्वच पक्षांच्या बैठका आणि आढावा सुरू झाला आहे. शिवसेनेकडूनही खासदार आणि आमदारांच्या बैठकीचा धडाका सुरू आहे. सर्व शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. यात अनेक कामांवर चर्चा झाली असून मतदारसंघाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात नेमकी राजकीय परिस्थिती, समस्या यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

आमदार संजय पोतनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्वांना बोलवून चर्चा करत आहेत. युती होईल यात शंका नाही. पण मतदार संघात अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचंही उद्धव ठाकेर म्हणाले अशी माहिती संजय पोतनीस यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘कमळ’ फुलल्यानंतर, अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजप नेत्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, युतीसाठी शिवसेनेचा ५०-५० फॉर्म्युला भाजपने तुर्तास अमान्य केला आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपचे १२२ आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे शिवसेनेला युतीसाठी भाजपने नवी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवाव्यात, अशी मागणी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या भाजपमध्ये ‘मेगाभरती’ सुरू आहे. त्यामुळे भाजपला त्यांच्या जागांची अदलाबदल हवी आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!