Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास

Spread the love

तीन दुचाकी लंपास
औरंगाबाद : वाहन चोरांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास केल्या. शुभम बापुराव जाधवर (२४, रा. अयोध्यानगर, सिडको एन-७) यांची दुचाकी (एमएच-२०-डीबी-५४३२) २४ आॅगस्ट रोजी हडको, टिव्ही सेंटर मैदानातून चोरून नेली. तर संतोष रमेश शिंगणे (२८, रा. टिव्ही सेंटर, हडको, एन-९) यांची दुचाकी (एमएच-२०-बीएफ-३७९२) २६ आॅगस्टच्या रात्री घरासमोरून चोरीला गेली. धनंजय शरपतराव तवार (३६, रा. सातारा परिसर) यांची दुचाकी (एमएच-२०-ईएम-१२६०) ३१ आॅगस्ट रोजी सिग्मा हॉस्पीटलजवळून चोरून नेली.
…….
पाटोदा शिवारात चोरट्यांचा धुमाकुळ ; घरात घुसून दाम्पत्याला लुटले
औरंगाबाद : वाहन चोर, मंगळसूत्र चोरांपाठोपाठ आता लुटारुंनी देखील शहरात धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. ३१ आॅगस्ट रोजी मध्यरात्री पाटोदा शिवारात शिरलेल्या लुटारुंनी चाकुचा धाक दाखवुन दाम्पत्याला लुटले. लुटारुंच्या हल्ल्यात महिला जखमी झाली.
मुळचे नंदुरबार येथील रमेश नंदु चव्हाण (४०, ह. मु. गट क्रमांक ३३, पाटोदा, ता. गंगापूर) हे खासगी नोकरी करतात. ३१ आॅगस्ट रोजी चव्हाण दाम्पत्य घरात असताना मध्यरात्री दिडच्या सुमारास लुटारुंनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. तेव्हा एवढ्या रात्री कोण आले म्हणून चव्हाण यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी तोंडाला रूमाल बांधलेले चार लुटारु घरात घुसले. त्यांनी चव्हाण दाम्पत्याला चाकुचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन ग्रॅमचे मंगळसूत्र, रोख तीन हजार रुपये आणि दोन हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. यावेळी चव्हाण यांच्या पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लुटारुंनी त्यांच्यावर पत्नीवर वार केला. यात त्यांच्या पत्नीच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली. यानंतर चव्हाण दाम्पत्याने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्ष अंतरप करत आहेत.

सहप्रवासी महिलांनी दागिने, रोख लांबवली
औरंंगाबाद : रिक्षात सहप्रवासी म्हणून बसलेल्या तिघींनी प्रवासी महिलेचे लक्ष विचलीत करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एक लाख सात हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी पावणेबारा ते एकच्या दरम्यान रेल्वेस्टेशन-जालाननगरदरम्यान घडली. महिला दुपारी रेल्वेस्टेशन समोरील पेट्रोल पंपाजवळून जालाननगर येथे जाण्यासाठी रिक्षात (एमएच-२०-बीटी-६६१०) बसली होती. त्यावेळी रिक्षात आधीपासून बसलेल्या तीन महिलांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यापैकी एका महिलेने पिशवीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यावर महिलेने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार राठोड करत आहेत.
…….
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
औरंगाबाद : भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सरवर खान गोरे खान पठाण (४५, रा. फुलेनगर, हर्सुल) हे जखमी झाले. ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सरवर खान पठाण हे सिल्वर अक्का गार्ड समोरून दुचाकीवर जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या कार (एमएच-२०-बीवाय-३३९८) चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून धुम ठोकली. याप्रकरणी कारचालकाविरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार सोन्ने करत आहेत.
…….
पूर्ववैमनस्यातून घराला आग
औरंगाबाद : पूर्ववैमनस्यातून तिघांनी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गाजवळ राहणा-या अनिस अजमोद्दीन अन्सारी (५०) यांच्या घराला ३१ आॅगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास आग लावली. शेख शाहीद शेख नजीर, शोहेब अजहर शेख, आमेर अयुब शेख (सर्व रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव) यांनी अनिस अन्सारी यांच्या घरावर पेट्रोल टाकुन आग लावली. या घटनेत घरातील घरगुती वापराचे सामान आदी जळून खाक झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करत आहेत.

घर फोडून रोख, दागिने लंपास
औरंगाबाद : रोशनगेट परिसरातील शरीफ कॉलनीत घर फोडून चोरांनी ५४ हजारांचा ऐवज लंपास केला. शेख रहिम शेख अमिर (४८, रा. शरीफ कॉलनी, गल्ली क्र. १४) यांच्या पत्नी ३० आॅगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पाणी आणणसाठी वाड्यात गेल्या होत्या. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोराने आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ५४ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार हेमंत सुपेकर करत आहेत.
……
मद्यपी दुचाकी चालकाविरूध्द गुन्हा दाखल
औरंगाबाद : मद्य सेवन करून दुचाकी चालविणा-या शिवाजी रामचंद्र बुरकुले (३८, रा. संजयनगर) याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी बुरकुले हे ३१ आॅगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास सेंट्रलनाका परिसरातील सहारा हॉटेल समोरून दुचाकी (एमएच-२०-ईटी-२२४७) दारूच्या नशेत चालवत असताना आढळला. याप्रकरणी जमादार संजय गावंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार शेख शकील करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!