Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एनआरसीच्या अंतिम यादीत १९ लाख नागरीकांना स्थान मिळाले नसल्याची आसाम सरकारची कबुली, पण घाबरून न जाण्याचे आवाहन

Spread the love

आसामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. भारताचे नागरीक असूनही अनेकांना एनआरसीमध्ये स्थान मिळाले नसल्याचे आसाम सरकारने कबूल केले आहे. पण अशा नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. ते परदेशी लवादाकडे दाद मागू शकतात असे आसाम सरकारने म्हटले आहे.

दरम्यान भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आसाममधील एनआरसीची अंतिम यादी समोर आल्यानंतर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एनआरसी हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या व्यापक कटाचा एक भाग असल्याचे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे. एनआरसीच्या अंतिम यादीत एखाद्याचे नाव नसले याचा अर्थ तो परदेशी नागरिक आहे असा नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेऊ शकतो. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी सरकार आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल, असेही सोनोवाल म्हणाले.

एनआरसी मसुदा गेल्या वर्षी ३० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामधून ४०.७ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण ३.२९ कोटी अर्जदारांपैकी २.९ कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता.

इम्रान खान यांनी खुपसले नाक

काश्मीर मुद्दावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे एकाकी पडलेल्या इम्रान खान यांच्याकडून भारतावर वाटेल तसे आरोप करण्यात येत आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार मुस्लिमांना संपवण्याच्या मोदी सरकारच्या नितीची जगभरात दखल घेतली गेली पाहिजे. भारताने काश्मीरचा मिळवलेला बेकायदा ताबा हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या व्यापक कटाचा भाग आहे असे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे. एनआरसीची अंतिम यादी त्यांनी आपल्या टि्वटमध्ये टॅग केली आहे. मागच्या आठवडयात इम्रान खान यांनी टि्वट करुन सध्याचे भारतातील सरकार फॅसिस्ट, जातीयवादी, नरसंहार आणि नाझी विचारांना मानणारे असल्याचा आरोप केला होता.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!