Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : विचित्र अपघातात दुचाकीस्वार महिला ठार, हर्सुल गावाजवळील घटना

Spread the love

समोर जात असलेल्या दुचाकीस्वार महिलेने अचानकपणे ब्रेक लावल्यानंतर पाठीमागून येणारी दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली. हा विचित्र अपघात सोमवारी (दि.५) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास हर्सुल गावाजवळील समृध्दी लॉन्ससमोर घडला. लताबाई नवनाथ खिल्लारे (वय २४, रा.खिल्लारी टाकळी, ता.भोकरदन,जि.जालना) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई खिल्लारे या सोमवारी सकाळी नवनाथ खिल्लारे (वय २८) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच-२१-बीबी-५८६५) वर भोकरदन येथून औरंगाबादकडे येत होत्या. हर्सुल गावाजवळील समृध्दी लॉन्स समोर पुढे जात असलेल्या दुचाकीस्वार महिलेने अचानकपणे ब्रेक लावल्यानंतर नवनाथ खिल्लारे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्लीप झाली. रस्त्यावर पडलेल्या लताबाई खिल्लारे यांच्या अंगावरून औरंगाबाद येथून सिल्लोडकडे जात असलेल्या एसटी बस क्रमांक (एमएच-४०-एन-५७६३) चे पाठीमागील चाक गेल्याने लताबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लताबाई खिल्लारे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त करून पोलिस ठाण्यात उभी केली आहेत.

दारुसाठी पैसे हिसकावले 
औरंगाबाद : मजूर तरुणाला दारुसाठी पैसे मागितल्यावर त्याने नकार देताच ओळखीच्या इसमाने पँटच्या खिशातील साडेआठशे रुपये हिसकावून पळ काढला. ही घटना रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एसटी वर्कशॉप ते मुकुंदवाडी रस्त्यावर घडली. सुनील महादेव शिंदे (वय २२, रा. मिसारवाडी) हा पायी जात असताना त्याला रवि रमेश गायकवाड (रा. नारेगाव) याने रस्त्यात गाठले. त्याच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. पण त्याने पैसे द्यायला नकार देताच गायकवाडने पँटच्या खिशातील पैसे हिसकावून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर शिंदेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करत आहेत.

दोन दुचाकी लंपास 
औरंगाबाद : घरासमोरुन दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन घटना नारेगावातील एकाच भागात एक दिवसाच्या अंतरावर घडल्या. शैजात खान अब्दुला खान (वय ३२) आणि अल्ताफ शेख करीम (वय ३०, दोघेही रा. अजीज कॉलनी, नारेगाव) यांच्या दुचाकी (एमएच-२१-जी-४६२७), (एमएच-२०-एडी-३११६) २० ते २२ जुलै दरम्यान घरासमोर उभ्या होत्या. यावेळी चोराने दोघांच्या दुचाकी लांबवल्या. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
——————————————————-
दारु विक्रेत्यांविरुध्द कारवाई 
औरंगाबाद : देशी दारुची अवैध विक्री करणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई करुन पावणेचार हजारांची दारु जप्त केली. हर्सुल परिसरातील जहांगिर कॉलनीत छापा मारुन पोलिसांनी मुरलीधर भीमराव ताकवाले (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, हर्सुल) याला पकडले. त्याच्याकडून ३१ बाटल्या जप्त केल्या. तसेच प्रदीप पुंडलिक जाधव (वय २३, रा. करोडी) याला पकडून पंधरा बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आकाश अनंत आठवले (वय २३, रा. वडगाव कोल्हाटी) याला शिवाजी चौकात पकडत २५ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
——————————————————-

हॉटेल चालकासह ग्राहकांवर कारवाई 
औरंगाबाद : दारु सेवन करण्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करुन दिलेल्या हॉटेल चालकासह ग्राहकांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शरद टि पॉईंटजवळील राजे संभाजी कॉलनीत असलेल्या सिंहगड हॉटेलवर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मालक अरुण विष्णु गव्हाड (वय ३८, रा. संभाजी कॉलनी, सिडको), ग्राहक शाम धनसिंग मेहर (वय ३३, रा. जाधववाडी), भाऊसाहेब कारभारी गायकवाड (वय ३०, रा. मयुर पार्क), पुंडलिक भानुदास शिंदे (वय ३०) आणि पंढरीनाथ एकनाथ शिंदे (वय ३८), दोघेही रा. नवनाथनगर, हडको अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————————————————-
ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर 
औरंगाबाद : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणासह त्याची आई गंभीर जखमी झाली. हा अपघात पैठण रोडवरील धुत बंगल्यासमोर ३ ऑगस्ट रोजी दुपारी दिडच्या सुमारास झाला. अपघातात अनिल किसनराव रहातवाड आणि लताबाई किसनराव (दोघेही रा. बालाजीनगर, बिडकीन, ता. पैठण) अशी जखमींची नावे आहेत. लताबाई आणि मुलगा अनिल असे दोघे एका रुग्णालयात आले होते. तेथून पैठण रोडने बिडकीनकडे दुचाकीने (एमएच-२०-सीएफ-१२३०) जात होते. यावेळी धुत बंगल्यासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक (एमएच-२०-डीई-८६५२) चालकाने धडक दिली. या अपघातात लताबाई यांच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. तर अनिलला देखील जबर दुखापत झाली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————————————————-
एसटी बसची काच फोडणारा अटकेत 
औरंगाबाद : एसटी बसची काच फोडणा-या माथेफिरुला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सिडको बसस्थानकाजवळील एका वाईन शॉपसमोर घडली. एसटी चालक मधुकर भुजंगा पाटोदेकर (वय ४०, रा. पाटोदा, ता. नायगाव, जि. नांदेड) हे बिलोली येथून प्रवासी घेऊन सिडको बसस्थानकात एसटी (एमएच-२०-बीएल-१९८८) नेत होते. यावेळी सुरेश पुंडलिक भाकरे (२८, रा. नारेगाव) याने दगड फेकून एसटीची समोरील काच फोडली. त्यावरुन त्याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————————————————-
आपसात हाणामारी : चौघांविरुध्द गुन्हा 
औरंगाबाद : भर चौकात आपसात हाणामारी करत असलेल्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली. शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अमजद खान खुदरत खान (२६, रा. रोहिला गल्ली) याला पकडले. तर तिघे पसार झाले. शिपाई देशराज मोरे यांच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार लईक करत आहेत.
——————————————————-
जनावरांचा टेम्पो पकडला 
औरंगाबाद : जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जात असलेला टेम्पो पकडून पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शहाबाजारातील चंपा चौकात करण्यात आली. शहाबाजारातून अरबाज इकबाल कुरेशी (रा. नुतन कॉलनी) आणि शाहरुख गुलाम हुसेन (रा. पैठणगेट) हे दोघे जनावरांना टेम्पोत (एमएच-२०-ईएल-१८०८) कोंबुन कत्तलीसाठी घेऊन जात होते. हा प्रकार पाहुन पोलिसांनी दोघांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, दोघांनी टेम्पोसह धुम ठोकली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन टेम्पो पकडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक तांगडे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!