Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रेल्वेचा खोळंबा, ही रस्ते वाहतूक करण्यात आली बंद

Spread the love

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची सिग्नल यंत्रणा पाण्यात गेली आहे. त्यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा दोन दिवस ठप्प राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागणार असल्याने, या मार्गावरील रेल्वे वाहतूकही दोन दिवस बंद राहणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, कसारा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दुरंतो एक्स्प्रेस इगतपुरी तर, सिंहगड एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवण्यात आली.

पेण रेल्वे स्थानकात दुष्मी रेल्वे गेट परिसरात भुस्खळन झाल्यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक काहीकाळासाठी ठप्प झाली होती. रेल्वेचे अधिकारी आणि राजधानी एक्स्प्रेसचा चालक यांना ट्रॅकवर पडलेला ढिगारा दिसला. चालक आणि कर्मचाऱ्यांमधल्या समन्वयामुळे राजधानी एक्सप्रेस ढिगाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर थांबवली गेली. त्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेवरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने कल्याणला येणारे तिन्ही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. कल्याण – शीळ फाटा, कल्याण – भिवंडी रोड आणि कल्याण – मुरबाड रोड आज दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच दुर्गाडी पूलही सर्वपेरकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांना येवई-बापगांव-गांधारी पुलावरून प्रवास करण्याचे आणि रांजणोली-कल्याण मार्गे दुर्गाडीला न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या तिन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ते उखडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. आधीच रेल्वेचा खोळंबा असताना कल्याणला जाणारी रस्ते वाहतूकही बंद ठेवल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!