Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nashik : गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा , पुढील २४ तासात अतिवृष्टी

Spread the love

नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गंगापूर धरणातून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्ट्रासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने धरणांमधील पाणी पातळी वाढली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसाने  नाशिक जिल्ह्यात चांगलाच उच्छाद मांडला आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मागील २४ तासांत २२१ मि.मी. तर इगतपुरीत १६४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. गंगापूर धरण समूहाचे हे पाणलोट क्षेत्र असून, या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सकाळी अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरुवात होऊ लागली. तासातासाला पाणी पातळी वाढत असल्याने प्राचीन पुरमापक असलेल्या दुतोंड्या मारुती बुडाल्याने बालाजी कोटाला पाणी लागले. रामसेतू पुल पाण्याखाली गेला. गोदाकाठवरील नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून सूचना आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत होता.

गोदाकाठाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दहा जवानांचे रेस्क्यू पथक गस्तीवर आहे. या पथकाकडून नदीकाठालगत ध्वनिक्षेपकांंद्वारे सावधानतेच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच अग्निशमन दलाचे पथकही गस्तीवर आहे.सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!