Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला

Spread the love

भिवंडीत शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे भिवंडी परिसरात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भातशेतीमध्ये पाऊसाचे पाणी तुंबून राहिल्याने भातलागवड तसेच भाजीपाला पीक कुजून जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शुक्रवारी दिवसभराच्या रिपरिपीनंतर रात्रभर पाऊसाने सतंधारेसह मुसळधारपणे कोसळत राहिल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. भिवंडी पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर तसेच नदीनाका आणि खोणी पुलावरून पाणी वाहू लागल्याने जुनांदुर्खी, कांबे ,टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखीवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, कुहे, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा तसेच शेलार, बोरपाडा, कवाड, अनगांव, पिळंजे, अंबाडी, विश्वभारती फाटा, दुगाड, पालखणे आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला आहे.

मुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने शहरातील शिवाजीनगर आणि पद्मानगर येथील भाजी मार्केटमधील किरकोळ भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील निजामपूरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजीनगर भाजीमार्केट, नझराना कंपाऊंड ,नदीनाका अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे व्यापारी आणि घरगुती रहिवाशांचे खूपच हाल झाले. तर निजामपूर पोलीस चौकी पाण्याखाली गेली होती.

पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे विविध मार्गावरील वहातूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडली होती. तर मुंबई – नाशिक महामार्गावर वहातूक कोंडी झाल्याने वहाने संथगतीने जात होती. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना वहातूक कोंडीचा सामना करावा लागला. रांजणोली बायपास नाका येथील टाटा आमंत्रण नागरी वस्तीत पाणी शिरल्या कारणाने येथील नागरिकांना आपल्या इमारतींमध्ये अडकून पडावे लागले. त्यामुळे रुग्णांना औषध उपचाराविनाच त्रास सहन करावा आहे. तर रात्रभर वीज गायब झाल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले होते. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा ,कामवारी ,तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला असून हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे पाऊसाचा जोर कायम राहिल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना महसूल यंत्रणेने दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!