Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तिहेरी तलाक : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर

Spread the love

प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने मुस्लिम समाजातून तीन तलाक कायमचाच हद्दपार झाला असून तीन तलाक देणं हा यापुढे गुन्हा ठरणार आहे. राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने देशभरातील मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.

आज सकाळी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात आलं. या विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली. त्याला भाजपने विरोध केला होता. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याबाबत राज्यसभेत मतदान घेण्यात आलं. यावेळी सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवण्याचा प्रस्ताव १०० विरुद्ध ८४ मतांनी फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर तिहेरी तलाक विधेयकावर मतदान होण्यापूर्वी काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली. आम्ही महिला सक्षमीकरणाच्या बाजूने आहोत, या विधेयकात काही दुरुस्ती करून ते मंजूर करण्यात यावं, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवायचं होतं, पण सत्ताधाऱ्यांनी आमची मागणी धुडकावून लावली, असं आझाद यांनी सांगितलं. त्यानंतर मुख्य विधेयकावर मतदान घेऊन ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. मतदान सुरू होण्यापूर्वी या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही पक्षांनी सभात्यागही केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!