Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

२४ तास उलटून गेले तरी सीसीडीचे मालक सिद्धार्थ यांचा तपास लागेना …

Spread the love

देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा २४ तासांनंतरही शोध लागलेला नाही. नेत्रावती नदीत युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे तसेच तटरक्षक दलानेही ओल्ड मंगळुरू बंदरापासून शोधकार्य सुरू केलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थ यांचा कारचालक बसवराज पाटील याचा कसून तपास सुरू आहे. पोलीस त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम समजून घेत आहेत. सिद्धार्थ यांचा सोमवारी रात्रीपासून कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळं पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलावरून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली. या वृत्तानंतर मंगळुरू पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे सोमवारी रात्री ८ वाजता त्यांच्या एसयूव्ही कारमधून बेंगळुरूला आले आणि ड्रायव्हरला गाडी उल्लाल ब्रिजवर घेऊन जाण्याची सूचना केली. बेंगळुरूहून निघताना सकलेशपूरला जात असल्याचा निरोप त्यांनी ठेवला. मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्यांनी गाडी मंगळुरूच्या दिशेनं घेण्याची सूचना ड्रायव्हरला केली. उल्लाल पुलावर आल्यावर त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितली. तिथं ते गाडीतून उतरले आणि ड्रायव्हरला गाडी थोडी पुढं नेऊन थांबण्यास सांगितलं. मी चालत येतो, असं ते म्हणाले. मात्र, ते आलेच नाहीत, असं चालकानं सांगितलं. यावरून सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला आहे.

कॅफे कॉफी डे (सीसीडी) विरोधात जी चौकशी सुरू आहे ती कायद्यानुसारच सुरू आहे, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. शोधमोहीम व छापेमारीत सबळ पुरावे हाती आल्यानंतरच जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जी कारवाई होईल ती कायद्यानुसारच होईल, असेही आयकर विभागाने पुढे स्पष्ट केले. ‘सीसीडी’चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता असून त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आयकर विभागाकडून छळवणूक झाल्याचा आरोप केला आहे. हा आरोप आयकर विभागाने फेटाळला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!