Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, पिचड यांचे राजीनामे; उद्या भाजप प्रवेश

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील वजनदार नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. शिवेंद्रसिंहराजेंच्या पक्षांतरामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या साताऱ्यात अनेक दिवसांपासून मुसंडी मारू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदारसंघात मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस- राष्ट्रवादी सत्तेत येईल असे वाटत नसून मतदारसंघातील लोकांची कामे व्हावीत याचसाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे मनोगत शिवेंद्रसिंहराजे यांनी राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

शिवेंद्रसिंहराजेंनंतर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादीचे वैभव पिचड यांनीही अपेक्षेनुसार विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे दिले आहेत. उद्याच मुंबईत गणेश नाईक, संदीप नाईक शिवेंद्रसिंहराजे, कोळंबकर आणि पिचड यांचा प्रवेश भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही, आणि तसे झाल्यास जनतेची कामे कशी करायची, असा सवाल उपस्थित करत मतदारसंघातील जनतेची माझ्यावर जबाबदारी आहे, अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मला हा निर्णय घेणे भागच होते असे शिवेंद्रसिह राजे म्हणाले.

माझी कुणावरही नाराजी नाही, मी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या शब्दाखातर पक्षाचे काम केले. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध असतानाही मी शरद पवार यांच्या शब्दाखातर हे काम केले. मी पक्षाशी गद्दारी केलेली नाही. मला काही करायचे असेल तर, हाच उमेदीचा काळ आहे असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. भारतीय जनता पक्षाने मला कोणतेही आश्वासन दिले नसून आपणही काही पक्षाकडे मागितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वडाळा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि अकोले मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांनी आपले आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. कोळंबकर हे काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला होता. तेव्हाच त्यांचा कल स्पष्ट झाला होता.

जनतेची कामे व्हावीत याचसाठी आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले, तर अकोले मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांमुळे आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे पिचड यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!