Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या ताकदीनं पुढे येईल : बाळासाहेब थोरात

Spread the love

‘काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. प्रत्येक गोष्टीला चढउतार असतात. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या ताकदीनं पुढे येईल, इतकंच नव्हे तर काँग्रेस पुन्हा भरारी घेईल’, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केला. दरम्यान, हा विश्वास सध्या कार्यकर्त्यांमध्ये देखील असून कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, यावेळी त्यांनी कर्नाटक प्रश्नी भाजप सरकारवर हल्लाबोल चढवत ‘भाजप पक्ष आहे की बकासूर?’ अशी टीका केली.

लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसने कंबर कसली आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु करीत इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला असून या पार्श्वभूमीवर दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी वरील वक्तव्य बुधवारी केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही विभाग निहाय बैठका घेत आहोत, काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहोत. त्याचसंदर्भात उद्या नवी मुंबईत कोकण विभागाची बैठक आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारप्रश्नी त्यांना विचारणा केली असता त्यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘भाजपला सत्तेची हाव असल्याची टीका करताना भाजप हा पक्ष आहे का बकासूर?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर ‘केंद्रात सत्ता आणि इतर राज्यात भाजपा पक्ष आहे पण विरोधकांच्या हातातील राज्य ही भाजपाला हवी आहेत. बकासुरासारखी सत्तेची हाव भाजपाला लागली’, असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या आघाडीचा बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेत तिसर्‍या आघाडीला एकत्र घेण्यासंदर्भात हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. यासंदर्भात बाळासाहेब थोरातांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, ‘जातीयवादी धर्मांध शक्तींविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. यामुळे आम्ही आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला तयार’, असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!