Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत साडे तीन लाखाचा घोटाळा

Spread the love

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चालू असणाऱ्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत साडे तीन लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत विद्यापीठातील तीन समन्वयकांवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूण ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. समन्वयकांनी विद्यार्थ्यांची खोटी नावे दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याधी या योजनेत आर्थिक अनियमितता झाल्याने एफ.आय.आर. दाखल करण्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल भानुदास मगर, सागर काळे, किरण गायकवाड हे तिघे कमवा आणि शिका योजनेसाठी समन्वयक म्हणून काम करतात. यांनी या योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे दाखवून त्यांचे पैसे लाटले. तर काही विद्यार्थी कमवा शिका योजनेत काम करत नसताना, त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून नंतर ते स्वतःकडे रोख स्वरुपात घेतले. याबाबत विद्यार्थी विकास महामंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांचा घोटाळा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा घोटाळा नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या काळात झाला आहे. उपनिरीक्षक एस. डी. दराडे या प्रकरणाचा तपास करीत आहे. अशा प्रकारचा घोटाळा होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार  माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्राथमिक तपास करण्यात आला. यात मिळालेल्या पुराव्याद्वारे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!