Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Vidhansabha : भाजप -सेना युतीच्या सरकारच्या अखेरच्या अधिवेशनाचे सूप वाजले , मुख्यमंत्र्यांनी केला कवितेने समारोप !!

Spread the love

‘मी पुन्हा येईन…’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन असून या अधिवेशनाचं सूप वाजण्यापूर्वी विधिमंडळाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी समर्पक अशा कवितेतून आपला निर्धार बोलून दाखवला.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारी २ जुलै रोजी संपलं. या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन होतं. काही महिन्यातच विधासभेच्या निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात सगळी छाया ही विधानसभा निवडणुकीचीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेवटच्या भाषणात राजकीय फटकेबाजी केली आणि ‘मी पुन्हा येईन’ असं सांगत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे संकेत देत विरोधकांबरोबरच मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलं असं म्हणणाऱ्या शिवसेनेलाही योग्य संदेश दिला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकारने केलेल्या जनहिताच्या कामांचा धावता आलेख मांडतानाच सभागृहात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आभारही मानले. आपल्या निवेदनाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’ ही स्वत: लिहिलेली कविता वाचून विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन होतं. येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्याआधीचं अधिवेशन निर्विघ्नपणे पार पाडण्यात सरकार यशस्वी ठरलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. त्याबद्दल आमचं ठरलं आहे, कुणीही याबद्दल बोलू नये अशी तंबीच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईन ही कविता म्हणत मुख्यमंत्री कोण असेल याचे स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जातंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!