Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जेंव्हा आमदारांना कल्याण रेल्वेस्थानकावर लुटले जाते ….रोकड आणि कागदपत्रे पळविली …

Spread the love

मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. कल्याण स्थानकावर हा प्रकार घडला असून आमदारांसाठी लावण्यात आलेल्या विशेष बोगीमध्ये ही चोरीची घटना घडली. आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळी अधिवेशनासाठी बुलडाण्याचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रेआणि शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर मुंबईला येत होते. आमदार बोन्द्रे हे आपल्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासह रविवारी मलकापूरहून विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. शिवसेनेचे आमदार रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला निघाले.

सोमवारी सकाळी ७ च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी चोरट्यांनी आमदारपत्नी वृषाली बोन्द्रे यांच्याकडील पर्स हिसकावली आणि पळून गेले. या बरोबरच चोरट्यांनी आमदार बोन्द्रे यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइलही पळवली. बोंद्रे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा केला, मात्र चोरट्यांनी पोबारा केला. आमदार बोंद्रे यांच्या पत्नी वृषाली यांच्या पर्समध्ये २६ हजारांची रोकड, एटीएम कार्ड आणि इतर साहित्य होते.

जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने निघालेले शिवसेनेचे आमदार रायमुलकर सकाळी कल्याण स्टेशनला उतरण्यासाठी उठले असता आपल्या खिशातील १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतकेच नाही, तर रायमुलकर यांच्या सोबत असलेले आमदार खेडेकर यांची बॅगही चोरट्यांनी ब्लेडने फाडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षांच्या कानावर आपण हा प्रकार घातला असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार बोन्द्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल्वे प्रवासात आमच्यासारखे जनप्रतिनिधीही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, असे म्हणत, हल्ली चोरांना अच्छे दिन आल्याचे दिसते असा टोलाही बोन्द्रे यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!