Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गडचिरोली स्फोट: निष्काळजीपणा भोवला , उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे अखेर निलंबित

Spread the love

महाराष्ट्र दिन( १ मे) रोजी कुरखेडा येथे झालेल्या भुसुरुंग स्फोटप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. शैलेश काळे यांनी योग्य काळजी न घेतल्यामुळेच शीघ्र कृती दलातील १५ जवान मृत्यूमुखी पडले असा आरोप करण्यात येत होता. या निर्णयाबाबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. १ मेला गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा जवळील एका पुलावर क्युआरटीच्या जवानांची एक जीप नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट करून उडवून टाकली होती. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. हे १५ही जवान गडचिरोली जिल्ह्याचेच रहिवाशी होते.

३० एप्रिलला गडचिरोलीतील दादापूर परिसरात नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती. या जाळपोळीची माहिती घेण्यासाठीच हे पथक दादापूरच्या दिशेने रवाना झालं असताना हा स्फोट झाला होता. प्रत्येक क्युआरटी पथकासोबत एक पाहणी पथक देण्यात यावं असा नियम आहे. क्युआरटी पथक येण्याआधी पाहणी पथक कायम सर्व रस्त्यांची पाहणी करत असतं आणि त्यानंतरच नक्षली भागात क्युआरटी पथक कारवाई करण्यासाठी प्रवेश करतं.

पण १ मे रोजी असं कोणतंही पाहणी पथक देण्यात आलं नव्हतं. गुप्तहेर खात्याने सावध करूनही कोणतीच पाहणी करण्यात आली नव्हती. यामुळेच काळे यांचा निष्काळजीपणाच या स्फोटला काही अंशी जबाबदार असल्याचा आरोप शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी केला होता. या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला होता. या अहवालाच्या आधारेच हे निलंबन करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकरांनी आज विधानसभेत दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!