जीवे मारण्याची धमकी दिल्याची काँग्रेस नगरसेवकाची खा. इम्तियाज जलील विरुद्ध तक्रार

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचे खासदार जलील यांनी कथितरित्या एका नगरसेवकाला धमकावले आहे. काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जलील यांनी खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुद्धा अफसर खान यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर एमआयएमची कामे करत नसल्याने आपल्याला वारंवार धमकावले जात आहे असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अफसर खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वीच शहरातील अवैध धंद्यांवर भाषण दिले होते. यात शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना चिरडावे लागेल आणि त्याची सुरुवात बेगमपुरा येथून करावी लागेल असे जलील म्हणाले होते. बेगमपुरा परिसरात अफसर खान पत्त्याचा क्लब चालवतात. तो मी बंद करणार आहे असेही जलील म्हणाले होते. त्याच भाषणाचा आधार घेऊन अफसर खान यांनी जलील यांच्याविरुद्ध पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.