अंगावर झाड पडल्याने मुंबईत दोघांचा मृत्यू

मालाड आणि जोगेश्वरी येथे झाड कोसळून झालेल्या दोन वेगवेगवळ्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मालाड येथील विजयकर वाडीजवळील नाडियादवाला कॉलनीत आज पहाटे साडे सहा वाजता शैलेश मोहनलाल राठोड यांच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे जखमी झालेल्या राठोड यांना कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. राठोड हे त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत होते.
जोगेश्वरी येथेही झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरीच्या महाकाली गुफा येथील तक्षशिला सोसायटी येथे काल संध्याकाळी ही घटना घडली. अनिल घोसाळकर यांच्या अंगावर गुरुवारी संध्याकाळी झाड कोसळल्याने घोसाळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात मुंबईत ७६ झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.