शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनी भावनिक झाले खैरे !! बघा काय म्हणाले ….

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व्यथित झाले आहेत . हा पराभव पाहण्याआधीच मी मेलो का नाही, अशा अत्यंत तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सेना -भाजपचे उमेदवार विजयी झाले पण औरंगाबादची जागा शिवसेनेने गमावली याचे शल्य खैरे यांना आहे . आपल्या पराभवाचे खापर ते भाजपचे प्रदेशासध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर फोडतात याबाबत त्यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि थेट अमित शहा यांच्याही कानावर हि गोष्ट घातली परंतु एकदा पराभव झाल्यानंतर या चर्चेला कुठलाही अर्थ राहत नाही हे खैरे यांचे मन अद्यापही मानायला तयार नाही .
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिवसैनिकांसमोर बोलताना खैरे म्हणाले , गेली २० वर्ष मी संभाजीनगरचा खासदार होतो. लोकांची कुठलीही कामे मी तत्परतेने केली. माझं स्वतःचं घरही मी बांधलं नाही, माझ्या घराकडे दुर्लक्ष करुन मी औरंगाबादकरांसाठी अहोरात्र काम केलं. मात्र, असं कोणतं वाईट काम मी केलं ज्यामुळे तुम्ही माझा पराभव केला. हा पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही.
यावेळी आपल्या पराभवाला कारणीभूत ठरलेले उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यावरही ते भडकले आणि त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. हर्षवर्धन जाधवांनी आपल्या आई-वडीलांची, वहिनीची हत्या केली. स्वतःच्या बायकोला अनेकदा मारहाण केली, असे आरोप यावेळी खैरे यांनी जाहीररित्या केले.