Whats App चा असाही फायदा , हरवलेली मुलगी सापडली !!

Whats App असो कि फेसबुक फेक न्यूज आणि अफवा पसरविण्यासाठी बदनाम असला तरी सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केला तर ते खरचं वरदान ठरू शकतं, हे एका ताज्या उदाहरणावरुन समोर आलं आहे. हरवलेली एक दहा वर्षांची मुलगी व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे सुखरुप सापडली. भोसरी पोलिसांनी हुशारीने केलेल्या या तपासाला यश आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील १० वर्षीय मुलगी राहत्या घरातून न सांगता परिसरातील एका मंदिराकडे गेली होती. मात्र, घरी परतण्याचा रस्ताच ती विसरल्याने हरवली होती. कार्तीकी खोडके असे या दहा वर्षीय हरवलेल्या मुलीचे नाव असून ती रस्ता चुकल्याने घरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी संबंधित घटनेची माहिती दिली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करुन घेत भोसरी पोलिसांनी मुलीचा फोटो आणि मोबाईल क्रमांक स्थानिक व्हाट्सअॅपवरील ग्रुपमधून व्हायरल केला आणि तिला शोधण्याची मोहिम सुरु केली. दरम्यान, एका सजग नागरिकाने कार्तिकीच्या वडिलांना आणि भोसरी पोलिसांना फोन करून मुलगी दिघी रोड येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने भोसरी पोलिसांनी संबंधीत ठिकाणी जाऊन खात्री केली असता कार्तिकी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेली त्यांना आढळली. तब्बल सात तासानंतर आपली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यासह १५ कर्मचाऱी या शोधकार्यात सहभागी होते.