Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माझा समावेश नको, जेटलींचे मोदींना पत्र

Spread the love

गेली पाच वर्षे मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाचं ठामपणे समर्थन करणारे व विरोधकांच्या आरोपांना उत्तरं देणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘नव्या मंत्रिमंडळात मला कोणतीही जबाबदारी देऊ नये,’ अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे केली आहे.

जेटली यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरूनही शेअर केलं आहे. प्रचंड बहुमतानं दुसऱ्यांदा निवडून आलेल्या एनडीए सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार या चर्चेला वेग आला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकाही सुरू आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळं जेटली हे या सर्व घडामोडींपासून दूर आहेत.

सरकारमधील मंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरू असतानाच आज जेटली यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. ‘मला तूर्त कोणतीही जबाबदारी देऊ नये,’ असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘मला सध्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागत आहे. उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत मला स्वत:साठी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळं नव्या सरकारमध्ये मला कोणतंही पद देऊ नये,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान समजतो. हा अनुभव माझ्यासाठी खूप काही शिकवणारा होता,’ असं सांगून जेटली यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. सत्ता नसताना पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मला मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद व विरोधी पक्षात असतानाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली. यापेक्षा जास्त माझी काही अपेक्षा नाही,’ असं त्यांनी नमूद केलं आहे.

गेल्या दीड वर्षांपासून जेटली हे किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्याशिवाय, त्यांना कर्करोगाचेही निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. त्यामुळं त्यांना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करता आला नव्हता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!