मराठवाडा आणि विदर्भ उन्हाने होरपळला , आणखी दोन दिवस होणार तापमानात वाढ

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याप्रमाणे काल दिवसभर अक्षरशः मराठवाडा आणि विदर्भ उन्हाने होरपळून गेला . मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाने चाळीशी पार केली होती . औरंगाबाद शहरात तर ४२.६ अंश सेल्सियस तापमान होते . दरम्यान, आणखी दोन दिवस बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात औरंगाबाद शहरामध्ये उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहराच्या तापमानाने चाळीशी ओलांडली होती. मे महिन्यामध्येही मराठवाड्याच्या बहुतांश शहरामध्ये पारा चाळीशीच्या आसपास होता. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे.